लोकनेत्याच्या जयंतीदिनी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर होणार आरोग्य शिबीर
परळी दि. २८ ------ लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या १२ तारखेला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात पुरूष व स्त्रियांच्या विविध आजारांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजा मुंडे व खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी या माध्यमातून रूग्णसेवेचा आधार देणारा उपक्रम हाती घेतला आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील वंचित, पीडित घटकांना आधार देण्याचे काम केले जाते. यावर्षी संपूर्ण जिल्हयात दुष्काळाची परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकरी, शेतमजूरांच्या हातात पैसा नाही, अशा स्थितीत गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री ना. पंकजा मुंडे व खा डाॅ प्रितम मुंडे यांनी आरोग्य शिबीराचे आयोजन करून लोकनेत्याची जयंती साजरी करण्याचे ठरवले आहे.
दि. १२ व १३ डिसेंबर अशा दोन्ही दिवशी हे शिबीर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. दरम्यान, गोपीनाथ गडावर होणार आहे. शिबीरात मुख कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, थायराॅईड, लिव्हर, किडनी या आजारांची तपासणी तसेच पुरूष व स्त्रियांसाठी हार्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भपिशवी, दुर्बिनीद्वारे बिनटाक्याचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणावर उपचार, चष्मे वाटप, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया बरोबरच हाडांच्या ठिसूळपणाची चाचणी व कृत्रिम अवयवांचे वाटप यावेळी होणार आहे
•