*मांडेखेल येथे आसुबाई माता नवरात्र उत्सवास सुरुवात
परळी
अखंड चालत असलेली आसुबाई माता नवरात्र उत्सवाची परंपरा जोपासण्यात यावर्षी तरुणाई सरसावली असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवास मांडेखेल येथे सुरुवात झाली आहे ,परळी पासून 17 किलोमीटर अंतरावर असलेले मांडेखेल या गावी आसुबाई माता देवीचे प्रसिद्ध मंदिर असून रेणुका मातेचे ते आठवे शक्तिपीठ अशी एक आख्यायिका लाभलेले हे मंदिर आहे असे भाविक भक्त सांगतात. आसुबाई माता जागृत देवीचे शक्तीपीठ असून ती नेहमी भक्ताच्या नवसाला पावणारी व पाठीशी उभी राहणारी आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे अखंड चालत असलेला नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात येथे साजरा केला जात ,तरुणाईचा विशेष सहभाग यामध्ये असतो तुळजापूर ते मांडेखेल अशी पायी दिंडी येथील तरुणाई काढते आणि येत असताना तुळजापूर येथील तुळजाभवानीची पेटती ज्योत घेऊन गावातील तरुण पळत आणि चालत ती ज्योत देवीच्या मंदीरापर्यंत आणतात विशेषतः ती ज्योत विझणार नाही याचीही काळजी येथील तरुणाई घेत आहेत ,नवरात्र उत्सवात नऊ दिवस विविध आराधी मंडळांचे सामने आयोजित केले जातात. हे सर्व आराधी मंडळाचे सामने देवीच्या मंदिरावर आयोजित केले जातात. त्यामध्ये सर्व गावातील गावकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन गावातील सर्व तरुण मिळून करतात. दररोज देवीची आरती व संध्याकाळी उपवासाचा फराळ भाविक भक्तांना वाटप करण्यात येतो अशी ही अखंड चालत असलेली परंपरा जोपासण्यात गावातील ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईचा ही विशेष सहभाग असतो पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील भाविक भक्त हे देवीच्या दर्शनासाठी येतात तरुणाईच्या या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे.