--------------
परळी वैजनाथ, दि.29, (प्रतिनिधी)ः-
येथील मान्यताप्राप्त, खासगी प्राथमिक, माध्यमिक विविध अनुदानीत शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना अकरा टक्के रोखीने लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बंडू अघाव यांनी दिली.
या संस्थेची 7 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.29) येथे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी श्री आघाव बोलत होते. सभेला संस्थेचे सचिव आलिशान काजी, उपाध्यक्ष संजय कराड, जेष्ठ संचालक अशोक मस्कले, उत्तम साखरे, महादेव धायगुडे, बालाजी कांबळे, सभासद राजकुमार लाहोटी, नितीन वायचळे, व्यवस्थापक रमेश देशमुख आदी उपस्थित होते. इतर सभासद, संचालक ऑनलाईन सहभागी झाले होते.
श्री अघाव म्हणाले, गेल्या सात वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे भागभांडवल 38 लाख 22 हजार 500 रूपये आहे. संस्थेला सरलेल्या आर्थिक वर्षात 12 लाख 98 हजार 957 रूपये नफा झाला आहे. संस्थेकडून सभासदांना दहा लाख रूपयापर्यंत साधे कर्ज दिले जाते तर 50 हजार रुपयांचे तातडी कर्ज दिले जाते. संस्थेने सरलेल्या आर्थिक वर्षापर्यंत साधे कर्ज दोन कोटी दोन लाख 21 हजार तर तातडी कर्ज चार लाख 84 हजार रूपये कर्ज वितरीत केले आहे असे सांगून श्री अघाव यांनी सभासदांना अकरा टक्के रोखीने लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
संस्थेचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे तसेच सर्व संचालक, सभासदांचे सहकार्य या बळावर संस्थेची प्रगतीकडे वाटचाल चालू असल्याचे श्री अघाव यांनी सांगितले. प्रास्ताविक सचिव आलिशान काजी यांनी केले. सभासदांनी संस्थेच्या कारभाराबाबत यावेळी ऑनलाईन प्रश्न विचारले. आभार प्रदर्शन अशोक मस्कले यांनी केले.