कृषिमंत्री, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व अधिकाऱ्यांकडून परळी तालुक्यातील जागेची पाहणी
परळी - दिनांक 16 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागामार्फत परळी येथे कृषी महाविद्यालय व अन्य 2 शासकीय संस्था सुरू करण्याचा घेण्यात आलेला निर्णयाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ प्रक्रियेस सुरुवात केली . मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परळी तालुक्यात कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय तसेच सोयाबीन प्रक्रिया, संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या प्रत्यक्ष हालचालीना सुरुवात झाली आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी एक वाजता परळी तालुक्यातील नियोजित जिरेवाडी परिसरातील शासकीय गायरान जागेमध्ये धनंजय मुंडे यांच्यासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच बीड जिल्हा कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महसूल व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित सदर जागेची पाहणी केली.
सदर तीनही संस्था उभ्या करण्यासाठी लागणारी जागा, पायाभूत सुविधा, त्यासाठी लागणारे बांधकाम व अन्य आराखडे, यासह विविध आवश्यक गोष्टी शासनाकडून उपलब्ध करून घेणे, यांसह विविध आवश्यक तांत्रिक बाबी व कागदपत्र प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेऊन या तीनही संस्थांचे आराखडे तातडीने सादर करावेत असे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कृषी महाविद्यालय उभारणीसाठी सुमारे 154 कोटी, कृषी व्यवसाय व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयासाठी सुमारे 135 कोटी तर सोयाबीन प्रक्रिया केंद्रासाठी सुमारे 24 कोटी असा एकूण सुमारे 314 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
दोनही महाविद्यालयांसाठी जिरेवाडी परिसरातील ही जागा अत्यंत योग्य व सर्व बाजूनी पूरक असून, नागापूर धरणातून गाळ आणून इथे साठवून इथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करता येईल, तसेच सोयाबीन प्रक्रिया केंद्रासाठी लोणी व वडखेल येथील जागा उपयुक्त असून दोन्हीपैकी एक जागा अन्य सुविधा बघून निश्चित करण्यात यावी अशीही सूचना धनंजय मुंडे यांनी केली.
या दोनही कृषी महाविद्यालयात सुरुवातीला प्रत्येकी 60 इतक्या विद्यार्थी संख्येस मान्यता देण्यात आली असून, शिक्षक व इतर असे एकूण सुमारे 170 पदे नव्याने निर्माण होणार आहेत. तर सोयाबीन प्रक्रिया केंद्रामध्ये 38 पदे निर्माण करण्यात येतील.
यावेळी ना. मुंडे यांच्यासह विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचे डॉ. यु.एम. खोडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, बाजीराव धर्माधिकारी, राजा खान, बालाजी मुंडे, माऊली मुंडे, जिरेवाडीचे सरपंच गोवर्धन कांदे, राजाभाऊ मुंडे, धोंडीराम मुंडे, बी एल रुपनर, बाळासाहेब सोनवणे, परळी तालुका कृषी अधिकरी श्री. अशोक सोनावणे यांसह संबंधित विभागाचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.