परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान महाशिवरात्र यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला.
श्री वैद्यनाथ पालखी सोहळा शुक्रवारी सायंकाळी सुरू होऊन शनिवारी पहाटे दोन वाजेपर्यंत संपन्न झाला. १ मार्च रोजी सकाळी मानाची बिदागी वाटप करून महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची यशस्वी सांगता करण्यात आली.
श्री वैद्यनाथ पालखी मिरवणुकीचा उत्साह
शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी "हर हर महादेव" आणि "वैद्यनाथ भगवान की जय" घोषणांनी श्री वैद्यनाथांची पालखी पारंपरिक मार्गावरून सवाद्य मिरवणुकीने काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला.
पालखी देशमुख पारावर पोहोचल्यावर प्रसिद्ध गायिका चैत्राली अभ्यंकर (पुणे) यांच्या भक्तिगीत व अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी या भक्तिसंगीताचा आनंद घेतला. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कलाकारांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले.
रात्री ९ वाजता अंबेवेस येथे भव्य आतषबाजी करण्यात आली. गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली येथे विविध कलाकारांनी सादरीकरण केले. शनिवारी पहाटे २ वाजता पालखी मंदिरात परत आली.
महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची सांगता
१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मंदिरात मानाच्या बिदागी वाटप कार्यक्रम संपन्न झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी २४ तासांत पाच लाखांहून अधिक भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले.
सायंकाळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. देशभरातून आलेल्या लाखो भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. यात्रेच्या सुरक्षिततेसाठी २०० हून अधिक पोलीस बंदोबस्तावर होते. सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केले, त्यामुळे दर्शन सोहळा सुरळीत पार पडला.
मंदिरातील खाजगी सुरक्षा एजन्सीच्या कर्मचारी सुनीता गायकवाड, कोंडा कांबळे, प्रियंका वाघमारे, आशा वाघमारे, प्रियांका सरवदे, गंगाराम डोने यांनी महाशिवरात्री दरम्यान उत्कृष्ट सेवा बजावली.
ट्रस्ट विश्वस्तांचा सन्मान
श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख आणि इतर विश्वस्तांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. ॲड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या भव्य महाशिवरात्र यात्रा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून ट्रस्टचे कौतुक करण्यात येत आहे.