परळी
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत अंबाजोगाई येथून एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण करून डॉ. आर. बी. जाजू साहेब यांनी 1984 मध्ये वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. त्यांच्या अथक सेवेमुळे परळी व परिसरातील असंख्य रुग्णांना आरोग्यलाभ झाला आहे.
योग्य निदान आणि परिणामकारक उपचारांमुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले डॉ. जाजू साहेब गेल्या चार दशकांपासून परळीकरांच्या सेवेत अहोरात्र तत्पर आहेत. ऍसिडिटी, हृदयरोग, गॅस्ट्रो, ताप, सर्दी-खोकला, मधुमेह यांसारख्या आजारांवरील त्यांच्या उपचारांनी अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. परिणामी, आजही रुग्णांचा त्यांच्याकडे प्रचंड विश्वास आणि ओढा आहे.
परळीतील गणेशपार रोडवरील जाजू हॉस्पिटल हे रुग्णांसाठी आशेचे ठिकाण ठरले आहे. विशेष म्हणजे परळी, सोनपेठ, गंगाखेड व इतर तालुक्यांतील रुग्ण त्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने उपचारासाठी येतात. कमी खर्चात, लवकरात लवकर रुग्णांना बरे करणे हा त्यांचा हातगुण आहे.
---
शिक्षण व व्यावसायिक कारकीर्द
डॉ. आर. बी. जाजू यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात पूर्ण केले, तर योगेश्वरी महाविद्यालयातून बीएससी उत्तीर्ण झाले. 1975 मध्ये सुरू झालेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचमध्ये त्यांनी एमबीबीएस प्रवेश घेतला आणि नेहमीच उत्कृष्ट गुणांसह यश संपादन केले. एमडी मेडिसिनचे शिक्षणही त्यांनी अंबाजोगाई येथे पूर्ण केले आणि 1984 मध्ये परळी येथे स्थायिक झाले.
सर्वप्रथम मुरुम येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा दिली. त्यानंतर गंगाखेड व सोनपेठ येथेही वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात बदली झाली, जिथे पाच वर्षे निस्वार्थपणे सेवा देत त्यांनी निष्णात डॉक्टर म्हणून लौकिक मिळवला.
---
रुग्णसेवेसाठी समर्पित जीवन
डॉ. जाजू यांच्या हसर्या चेहऱ्याने आणि आपुलकीच्या संवादाने अनेक रुग्णांना मानसिक दिलासा मिळतो. त्यांचे योग्य निदान व प्रभावी उपचार यामुळे रुग्णांचा त्यांच्यावर अढळ विश्वास आहे. त्यांच्या वैद्यकीय प्रवासात त्यांच्या पत्नी डॉ. मंगला जाजू यांनी त्यांना भक्कम साथ दिली आहे.
त्यांचे चिरंजीव डॉ. महिंद्र जाजू व डॉ. सोनम जाजू देखील त्यांच्या रुग्णसेवेत सक्रिय सहकार्य करत आहेत. त्यांची मुलगी मयुरा जाजू-मंत्री ही लंडनमध्ये इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. डावळे सर यांचे मार्गदर्शन हे आपले वैद्यकीय शिक्षण घडवण्यात मोलाचे ठरल्याचे ते आवर्जून सांगतात. शिक्षणासाठी त्यांना माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ, पुणे, माहेश्वरी प्रगती मंडळ मुंबई आणि श्रीकृष्णदास जाजू स्मारक ट्रस्ट यांची शिष्यवृत्ती मिळाली होती. मात्र, व्यावसायिक स्थैर्य मिळाल्यानंतर त्यांनी या ट्रस्टसाठी शिष्यवृत्तीपेक्षा कितीतरी पट अधिक निधी इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला, हे त्यांचे मोठेपण दर्शवते.
---
साधेपणा आणि सेवाभाव यांचा अद्वितीय संगम
अशा साध्या, सरळ, सेवाभावी आणि निष्णात डॉक्टर डॉ. आर. बी. जाजू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
"आरोग्य हीच खरी संपत्ती" या तत्त्वाने रुग्णसेवा करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!