परळी : शहरातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफरखान उस्मान खान तसेच माजी नगरसेवक राजा खान यांचे सामाजिक योगदान हे सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी ठरले आहे. मुस्लिम समाजातील गरजू कुटुंबांसाठी ते दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपतात.
यावर्षीही ४ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मलकापूर रोडवरील जे. के. मंगल कार्यालयाच्या फंक्शन हॉलमध्ये मुस्लिम समाजातील १९ वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात गरिब कुटुंबांना आर्थिक सवलत मिळावी व अनावश्यक खर्च टळावा, या हेतूने गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम अविरत सुरू आहे.
या विवाह सोहळ्यात ५ हजारांहून अधिक लोकांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली असून, हा सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. सामूहिक विवाह म्हणजे केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, तो समाजातील एकतेचे आणि मदतीच्या हातांचे प्रतीक ठरतो. या उपक्रमामागे खान कुटुंबाचा दृष्टीकोन नेहमीच व्यापक व प्रेरणादायी राहिला आहे.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जाफर खान उस्मान खान, हाजी राजा खान, उमर खान, वाहेद खान, शाहेद खान, शेख मझहरूद्दिन, जफर खान, नदीम खान, हाफेज तारेक खान, फेरोज खान, फाजेब खान व तौफिक खान यांनी केले आहे.