परळी,– सामाजिक एकतेचा आणि सहकार्याचा उत्तम संदेश देणारा मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी परळीत पार पडला. जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते जाफरखान उस्मान खान तसेच माजी नगरसेवक हाजी राजा खान यांच्या पुढाकाराने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मलकापूर रोडवरील जे. के. मंगल कार्यालयाच्या फंक्शन हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात मुस्लिम समाजातील १९ वधू-वर विवाहबध्द झाले . वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गरिब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू असून, या वर्षीही उत्साहात आणि सुसंघटितपणे पार पडला.
या सोहळ्याच्या निमित्ताने ५ हजारांहून अधिक पाहुण्यांच्या जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. नवविवाहित वधू वरांना जे. के. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात अधिक सुखकर झाली.
कार्यक्रमास मुफ्ती सय्यद अशफाक , आयोजक जाफरखान उस्मान खान, हाजी राजा खान, डॉ. राजाराम मुंडे,कॉन्ट्रॅक्टर दिनेश परमार, भाजप नेते शेख अब्दुल करीम, भाजप युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, मुन्ना बागवाले, माजी उपनगराध्यक्ष आयुब, उमर खान, समंदर लाला, नाजेर हुसेन, एजाज खान, वाहेद खान, शाहेद खान, विनोद बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
"समाजातील सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी आणि अनावश्यक खर्च टळावा, हा उद्देश ठेवून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आम्ही करत आलो आहोत. हा उपक्रम पुढे ही अविरत सुरू राहील," असे आयोजक जाफरखान उस्मान खान यांनी सांगितले.