परळी (प्रतिनिधी) : परळी शहरातील नवीन शक्ती कुंज वसाहतीतील विद्यावर्धिनी विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व जीवन कराड याने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत परळी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अथर्वच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.
दररोज पाच तास अभ्यास करून मिळवले यश
अथर्वने बोलताना सांगितले की, "मी दररोज सुमारे पाच तास नियमित अभ्यास करत होतो. त्यामुळे हे यश अपेक्षितच होते." पुढील शिक्षणासाठी त्याने लातूरची निवड केली असून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा त्याचा निर्धार आहे.
आई-वडील, आत्या-मामा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
"मी मूळचा इंजेगावचा असून परळीतील माझ्या आत्या मीरा व मामा गोविंद मुंडे यांच्या घरी लहानपणापासून राहतो आहे. त्यांचे मला सतत मार्गदर्शन लाभले. तसेच माझे आई-वडील आणि शिक्षकांनीही मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो," असे अथर्वने सांगितले. अथर्वचे वडील परळीत दुग्ध व्यवसायासोबत शेतीही करतात.
विद्यावर्धिनी विद्यालयाचा देखील 100% निकाल
परळी येथील विद्यावर्धिनी विद्यालयाचा यंदाचा निकालही उज्ज्वल ठरला आहे. यंदा शाळेचे २१८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्व २१८ जण उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अथर्व कराड याने १००% गुण मिळवले, तर ९५ ते ९९% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २९ आहे. ९०% पेक्षा जास्त गुण ५८ विद्यार्थ्यांनी मिळवले असून ७५ ते ९०% गुण श्रेणीत ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर नीला यांचे कौतुक*
विद्यार्थ्यांच्या यशावर प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक राजेश्वर नीला* म्हणाले, “अथर्वने आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आमच्या संस्थेतच झाले आहे. हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.”