मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना .एकनाथराव शिंदे व ना. चंद्रकांत पाटील यांचे संघटनेने मानले आभार
मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामध्ये कार्यरत संपादक आणि पत्रकारांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. राज्य शासनाने ३ जून रोजी अधिकृत परिपत्रक काढून डिजिटल चॅनल्स व वेब पोर्टल्सना राजमान्यता दिली असून त्यांना आता शासकीय जाहिराती देण्यात येणार आहेत.
या क्रांतिकारक निर्णयामागे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा गेल्या सहा वर्षांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असून या संघटनेचे नेतृत्व वरिष्ठ संपादक राजा माने यांनी केले आहे. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि ग्रामीण भागांपासून मेट्रो शहरांपर्यंत पसरलेल्या डिजिटल पत्रकारांना याचा मोठा लाभ होणार आहे.
महाबळेश्वरच्या भिलारमध्ये आणि कनेरी मठ (कोल्हापूर) येथे झालेल्या संघटनेच्या अधिवेशनात तात्कालीन मुख्यमंत्री (सध्याचे उपमुख्यमंत्री) एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजमान्यतेबाबत आश्वासन दिले होते. अखेर या आश्वासनांची अंमलबजावणी झाली असून यासाठी महायुतीतील सर्व नेत्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार, तसेच ना. चंद्रकांत पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत संघटनेच्या यशस्वी पाठपुराव्याचे फलित
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना असून देशभरात १२,००० हून अधिक डिजिटल संपादक व पत्रकार हे या संघटनेचे सभासद आहेत. २०१९ पासून राज्य शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत या संघटनेने डिजिटल मीडियाला शासकीय मान्यता आणि जाहिरात धोरणाचा लाभ मिळवून देण्यात यश मिळवले आहे.