परळी, ३ जून – "आज वडील गोपीनाथराव मुंडे असते, तर देशाच्या मोठ्या पदावर दिसले असते," या शब्दांनी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या अकराव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपली भावना व्यक्त केली.
परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगडावर ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने मो ठ्या श्रद्धेने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची अकरावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातून आलेले हजारो कार्यकर्ते, चाहत्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले.. ढोक महाराजांच्या
कीर्तनानंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "अकरा वर्षांपूर्वी वडील गेले आणि आमचं संपूर्ण आयुष्यच बदललं. पण या संकटात आम्हाला ज्या ज्या व्यक्तींचा आधार लाभला, त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते."
त्यांनी पुढे सांगितलं की, गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांचे जिवलग सहकारी आर.टी. देशमुख (जिजा )यांचाही अपघात झाला. हे अपघात आमच्या जीवनात कायमचा ओरखडा देऊन गेले. पण त्याच वेळी या दुःखातून आम्ही सेवा आणि समाजकार्याच्या मार्गावर चालण्याचं व्रत घेतलं."
याच भावनेतून दरवर्षी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाही गोपीनाथगडावर रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी, तसेच शेळी-मेंढी औषध वाटप, आणि शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. पर्यावरणसंवर्धनासाठी 'नो प्लास्टिक' उपक्रम राबवून वृक्षांची रोपे व कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, " गोपीनाथराव मुंडे यांना सामान्य माणसाच्या दुःखाची जाणीव होती. ते वंचितांचा आवाज होते. आज आर.टी. देशमुख यांचा फोटोही गोपीनाथरावांच्या समाधीजवळ लावण्यात आला आहे, कारण ते आमच्या कुटुंबाचेच एक अविभाज्य अंग होते."
या कार्यक्रमात मुंडे कुटुंबातील सर्व सदस्य – पंकजा मुंडेंच्या आई प्रज्ञा मुंडे, काकू रुक्मिणीबाई, भाऊ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे, तसेच बहीण आणि माजी खासदार प्रीतम मुंडे ,अजय मुंडे,रामेश्वर मुंडे अनेक वर्षांनंतर एकत्र आले होते. हे पाहून उपस्थितांमध्ये भावनिक उर्मी उसळली.
कार्यक्रमाला माजी मंत्री महादेव जानकर,आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, बदामराव पंडित, देविदास राठोड , गोविंद केंद्रे,गजानन घुगे, मुरकुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री ,परळी चे आमदार धनंजय मुंडे यांनीही सकाळी काका गोपीनाथरावांच्या समाधीचे दर्शन घेतले. व कार्यक्रमाला हजर होते.