परळी विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा
जयंत पाटलांच्या स्वागतासाठी परळी वैद्यनाथ नगरी सज्ज
परळी (दि. 26) ---- : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संकल्पनेतुन साकारलेली 'राष्ट्रवादी परिवार संवाद - संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी' ही यात्रा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या पर्वात बीड जिल्ह्यात सोमवारी (दि. 27) रोजी येत असून सोमवारी सायंकाळी 6.00 वा. परळीत पोहचणार आहे.
ना. जयंत पाटील हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील पक्ष संघटनेचा शहरातील हालगे गार्डन येथे आढावा घेणार असून, या बैठकीस ना. धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री ना. राजेशभैय्या टोपे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, रा.कॉ. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कु. सक्षना सलगर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, रा.कॉ. चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांसह बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ना. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच परळी दौऱ्यावर येत असून, परळी वैद्यनाथ नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे! परळी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ना. पाटील व सहकाऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
दरम्यान सायंकाळी 6 वाजल्यापासून ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हालगे गार्डन येथे पक्ष संघटनेच्या विविध आघाड्यांची आढावा बैठक होणार असून, या बैठकीसाठी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सर्वांनी कोविड विषयक नियमांची खबरदारी घेत बैठक स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.